‘वेगळ्या विदर्भ’वरून वडेट्टीवार-ठाकरेंचे मतभेद

0

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरात सुरू आहे. राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि सत्ताधारी-विरोधक देखील उपस्थित आहेत. गेल्या काही काळापासून वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय या भागाचा विकास होणार नाही, असे म्हटले होते. दरम्यान वेगळ्या विदर्भाला पूर्वीपासून विरोध असलेले परंतु सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करताना वडेट्टीवार म्हटले होते की, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचं प्राबल्य राहिले आहे. या समाजांच्या दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर या लोकांना सत्तेत फार कमी संधी मिळाली आहे. त्यामुळे या भागाला न्याय मिळालेला नाही. यासाठी वेगळा विदर्भ झाला पाहिजे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही कारण महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे आणि विदर्भ महाराष्ट्राचा आहे. काँग्रेस जरी वेगळा विदर्भाचा विचार करत असला तरी शिवसेनेचा त्याला पाठिंबा नसल्याचे यावरून दिसून आले. विदर्भ हा अखंड महाराष्ट्राचा भाग असून त्याला कोणीही वेगळा करू शकत नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठाकरे पुढे म्हणाले की, वेगळ्या विदर्भाची मागणी होऊ शकत नाही. तो महाराष्ट्राचा भाग आहे. यावर त्यांनी राज्य सरकारलाही प्रश्न केला. अखंड महाराष्ट्राचे सरकार तुकडे करणार आहे का हे त्यांनी जाहीर करावे. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांवर अधिक चर्चा होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. मात्र विदर्भ सोडून महापालिका निवडणुका लक्षात घेता इतर भागांसाठीच घोषणा केल्या जात असल्याचे ठाकरे म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातील आहेत. सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिता. कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे. जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा नाही. त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनात विदर्भासाठी कोणते प्रश्न मांडले हे वेगळा विदर्भ मागणाऱ्यांना सांगावे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech