विधानभवनात आव्हाड-पडळकर कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ आणि मारहाण

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बुधवारी क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ झाली होती. त्यावरून विधिमंडळाच्या प्रांगणात वाद झाला होता. दरम्यान आज त्याचा दुसरा अंक विधान भवनातील लॉबीमध्येच पडळकर- आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीने झाला. शिवीगाळ आणि मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात अशा प्रकारची घटना घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

गुरुवारी संध्याकाळी आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीमध्ये आमनेसामने आले. आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. लॉबीत उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक, पोलीस आणि इतर कार्यकर्त्यांनी हा वाद कसाबसा सोडवला. वाद नेमका कसा सुरू झाला, नेमकं काय घडलं हे अद्याप समजू शकलेले नाही.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील काही वेळाने तिथे पोहोचले. आव्हाडांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे तक्रारही केली. या पडळकरांना मारणार, असं कार्यकर्ते जयंत पाटील यांना सांगत होते. शेवटी पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला पोहोचले. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

याआधी आव्हाड हे बुधवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आव्हाड समर्थकांनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech