नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे अधिवेशन ८ ते १० दिवस पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान यासंदर्भात संकेत दिले.
ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे अगोदरच हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग दाटले आहेत. मंत्र्यांच्या अनेक बंगल्यांचे काम प्रलंबित आहे. १५० कोटींची बिले थकीत असल्याने ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नागपूरऐवजी मुंबईत अधिवेशनाची चर्चा सुरू झाली होती. मात्र नागपूर करारानुसार विधीमंडळाचे एक सत्र नागपुरमध्ये घेणे बंधनकारक आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे आहेत.
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे मतदान होईल. त्यात सरकारी यंत्रणादेखील कामात असेल. त्यामुळे त्यानंतरच हिवाळी अधिवेशन घेणे शक्य गोणार आहे. याबाबत विचार सुरू आहे, मात्र कुठलाही निर्णय वगैरे झालेला नाही. अखेरचा निर्णय सर्वसंमतीनेच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.