पाटणा : यंदाचे आयपीएल गाजवणारा राजस्थान रॉयल्स संघाचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आज (दि.३०) बिहारमधील पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींची भेट घेतल्यावर वैभव सूर्यवंशीने त्यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.यावेळी वैभव याचे आई-वडील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत वैभव आणि त्याच्या कुटुंबाच्या भेटीची माहिती दिली. तसेच त्यांनी या भेटीचे फोटोही शेअर केले. “पटना विमानतळावर युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आनंद झाला. त्याच्या क्रिकेट कौशल्याची संपूर्ण देशात प्रशंसा सुरु आहे. त्याला भविष्यातील वाटचालीकरिता मी शुभेच्छा देतो”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं.
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने एकूण ७ सामने खेळले होते. त्यात त्याने ३६ च्या सरासरीने २५२ धावा काढल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा २०६.५५ एवढा राहिला. तसेच वैभव सूर्यवंशीने एकूण १२२ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि २४ षटकारही ठोकले.आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर वैभव सूर्यवंशीचे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे आयपीएल २०२५ च्या लिलावामध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी विविध फ्रॅन्चायझींमध्ये चढाओढ लागली होती. वैभव सूर्यवंशीचा बेस प्राईस ३० लाख होती. अखेरीस राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटी रुपयांना खरेदी केले होते.