बीसीसीआयची समिती बनवणार मार्गदर्शक तत्त्वे
मुंबई : बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीन सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. या समितीचे नेतृत्व बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया करणार आहेत. उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार प्रभजेत सिंग भाटिया हे देखील या समितीचा भाग असतील. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन करण्यात आली आहे. बीसीसीआयची ही तीन सदस्यीय समिती १५ दिवसांची मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. याचा उद्देश बेंगळुरूमध्ये विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटना रोखणे असेल.
बीसीसीआयने याबाबत माध्यमांनाही माहिती दिली आणि भविष्यात अशा घटना रोखण्याच्या उद्देशाने सर्वोच्च परिषदेने ही समिती स्थापन केल्याचे सांगितले आहे. ३ जून रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला होता. बंगळुरू संघाने पहिले आयपीएल जेतेपद जिंकले आणि ट्रॉफी उचलली आणि विजय साजरा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ जून रोजी संघ विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचला. या जल्लोषादरम्यान लाखो लोकांचा जमाव बंगळुरूला पोहोचला. त्याच दिवशी या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि ११ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला.