बंगळुरु : कर्नाटकातील बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजयी मिरवणूकीदरम्यान ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर कर्नाटक सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास कुमार यांना निलंबित केले होते. पण आता केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच कॅटने मंगळवारी त्यांचे निलंबन रद्द केले आहे. बंगळुरू खंडपीठाचे न्यायमूर्ती बीके श्रीवास्तव आणि प्रशासकीय सदस्य संतोष मेहरा यांच्या खंडपीठाने २४ जून रोजी या प्रकरणाता निर्णय राखून ठेवला होता. जो आता जाहीर करण्यात आला आहे. कॅटने विकास कुमार यांच्या बाजूने निकाल दिला आणि म्हटले की, त्यांना सेवा नियमांनुसार सर्व फायदे मिळतील. आयपीएस अधिकारी विकास कुमार यांच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील ध्यान चिन्नप्पा म्हणाले की, कॅटने निलंबन बेकायदेशीर ठरवत ते रद्द केले आहे. तसचे अधिकाऱ्याला सर्व सेवा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. कॅटने असेही म्हटले आहे की, तत्कालीन पोलीस आयुक्त बी. दयानंद आणि डीसीपी शेखर एच. तेप्पन्नावर यांनाही या निर्णयाचा फायदा मिळू शकतोज्यामुळे त्यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.