ब्रायन लाराचा कसोटीतील ४०० धावांचा विक्रम अबाधित

0

हरारे : ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील ४०० धावांचा ऐतिहासिक विक्रम क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. लाराने १२ एप्रिल २००४ रोजी वेस्ट इंडिजमधील सेंट जॉन्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ही अविश्वसनीय खेळी केली होती. आता ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम मोडण्याची संधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डरकडे चालून आली होती. मात्र, मुल्डर ३६७ धावांवर खेळत असताना त्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव घोषीत केला. आणि ब्रायन लाराचा कसोटीत ४०० धावांचा विक्रम अबाधित राहिला आहे.

केशव महाराज दुखापग्रस्त झाल्यामुळे वियानकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धुरा सोपवण्यात आली होती. वियान मुल्डरने ३३४ चेंडूंमध्ये ४९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ३६७ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यात त्रिशत झळकावणारा तो हाशिम आमलानंतर दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. आमलाने २०१२ मध्ये ३११ धावांची खेळी केली होती. तर कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो २९ वा क्रिकेटपटू आहे.

बुलावायो येथे झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात वियान मुल्डरने त्रिशतक झळकावले. तो लंचच्या वेळी ३६७ धावांवर नाबाद होता. आणि दक्षिण आफ्रिकन संघाची धावसंख्या ५ बाद ६२६ धावांवर होती. लंचच्या वेळीच मुल्डरने डावाची घोषणा केली. आपल्या विक्रमापेक्षा त्याने संघाच्या विजयाला अधिक प्राधान्य दिल्याने क्रिकेट जगतामधून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech