पॅरिस : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये जर्मनीच्या ज्युलियन वेबरला मागे टाकत दोन वर्षांनी पहिले डायमंड लीग विजेतेपद पटकावले. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर थ्रो करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसऱ्या फेरीत त्याचा थ्रो हा ८५.१० मीटर होता. त्यानंतर त्याने पुढील तीन प्रयत्नांना फाउल केले आणि त्याच्या सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ८२.८९ मीटर भालाफेकची नोंद केली. जर्मनीचा ज्युलियन वेबर ८७.८८ मीटरच्या पहिल्या फेरीसह दुसऱ्या क्रमांकावर होता.तर ब्राझीलचा लुईझ मॉरिसियो दा सिल्वा ८६.६२ मीटरच्या तिसऱ्या फेरीच्या प्रयत्नात तिसऱ्या क्रमांकावर होता. चोप्राने १६ मे रोजी डायमंड लीगच्या दोहा लेगमध्ये ९०.२३ मीटरच्या फेकसह ९० मीटरचा टप्पा ओलांडला होता. या स्पर्धेत त्याने दुसरे स्थान पटकावले होते. वेबरने दोहा येथे ९१.०६ मीटरच्या शेवटच्या फेरीत थ्रो करून विजेतेपद जिंकले होते.