लखनऊ : आयपीएलच्या १८ व्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीबाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौच्या मैदानात रंगलेली २०० पारची लढाई जिंकत लखनौ सुपर जाएंट्सलाही आपल्यासोबत प्लेऑफ्सच्या शर्यतीतुन बाहेर केले. लखनौच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पॅट कमिन्स याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मिचेल मार्श ६५ (३९) आणि एडन मार्करम ६१ (३८) या सलामी जोडीच्या अर्धशतकानंतर निकोलस पूरन याने २६ चेंडूत केलेल्या ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २०५ धावा करत हैदराबादसमोर २०६ धावांचे टार्गेट सेट केले होते.
लखनौनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स संघातील अथर्व तायडे ९ चेंडूत १३ धावा करून तंबूत परतला. पण त्यानंतर अभिषेक शर्मा २० चेंडूत ५९ धावांच्या खेळीसह सामना सेट करून माघारी फिरला. इशान किशन याने २८ चेंडूत उपयुक्त अशी ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर क्लासेन २८ चेंडूत ४७ धावा करून माघारी फिरला. कानिंदू मेंडिस ३२ धावांवर रिटायर्ड हर्टच्या स्वरुपात तंबूत परतल्यावर अनिकेत वर्मा आणि नितेश कुमार रेड्डी या जोडीनं हैदराबादच्या विजय पक्का केला. हैदराबादच्या संघाने ६ विकेट्सने सामना जिंकला
हैदराबादच्या संघाने सामना जिंकत लखनौचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला . या निकालानंतर आता प्लेऑफ्सच्या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यानंतर चौथा संघ कोण हे चित्र २१ तारखेला स्पष्ट होईल.