नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) “भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ” आणि “टीम इंडिया” हे शब्द वापरणे थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. याचिकेत प्रसार भारतीला बीसीसीआय संघाचा “टीम इंडिया” असा उल्लेख करण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती. याचिका फेटाळून लावताना, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले आणि कोर्टावर अनावश्यक भार न टाकण्याचा सल्ला दिला.
वकील रिपक कंसल यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांनी यापूर्वी दिल्ली हाय कोर्टात धाव घेतली होती. आणि तिथे त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यांनी दिल्ली हाय कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्राम कोर्टात अपील केले होते. ज्यामध्ये बीसीसीआयने क्रिकेट संघासाठी “इंडियन नॅशनल क्रिकेट संघ” किंवा “टीम इंडिया” हे शब्द वापरणे थांबवावे अशी मागणी केली होती. त्यांनी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ चालवणाऱ्या प्रसार भारतीनेही “टीम इंडिया” हा शब्द वापरणे थांबवावे अशी मागणी केली होती.
हाय कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर, त्यांनी सुप्राम कोर्टात धाव घेतली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी त्यांची याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला आणि हाय कोर्टाला फटकारले. याचिका फेटाळून लावताना मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला फटकारले की, “तुम्ही घरी बसून याचिका दाखल करायला सुरुवात करा. त्यात काय अडचण आहे? राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरणासाठी एक अधिसूचना देखील आहे, ज्यामध्ये उत्कृष्ट सदस्य आहेत. कोर्टावर अनावश्यक भार टाकू नका.”