आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

0

पाटणा : बिहारमधील १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये धमाकेदार फलंदाजी करून साऱ्यांचे लक्ष वेधले. सर्वात तरुण खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्सकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले.स्पर्धेनंतर आता वैभव सूर्यवंशी बिहारमध्ये त्याच्या घरी परतला. आयपीएलमधील यशानंतर वैभवचे त्याच्या घरी भव्य स्वागत करण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिहारच्या वैभवने पदार्पणाच्या आयपीएलमध्येच साऱ्यांना अवाक् केले. आयपीएलमध्ये त्याने केलेल्या फटकेबाजीचे सर्वत्र कौतुक झाले. राजस्थानचा संघ संघर्ष करत असतानाही वैभवने संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता तो त्याच्या मूळ गावी ताजपूर (समस्तीपूर, बिहार) येथे परतला. तिथे त्याचे स्वागत हार घालून आणि केक कापून करण्यात आले. ‘घरात स्वागत आहे बॉस बेबी वैभव’ असे केकवर लिहिले होते. यावेळी घरात वैभव-वैभव नावाचा जयघोष घुमला. संपूर्ण कुटुंब आणि आजूबाजूचे लोक या आनंदोत्सवात सहभागी झाले.

राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला १ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केले होते. राजस्थान संघ अतिशय वाईट पद्धतीने प्लेऑफमधून बाहेर पडला. पण या हंगामात भारतीय क्रिकेटला वैभवच्या रूपात एक धडाकेबाज खेळाडू मिळाला. आयपीएलच्या काही सामन्यांनंतर वैभव सूर्यवंशीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली.

वैभवने यंदाच्या हंगामात ७ सामने खेळले आणि ३६च्या सरासरीने २५२ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट २०६ एवढा होता. त्याच्या तिसऱ्या सामन्यात वैभवने ३५ चेंडूत धमाकेदार शतकही झळकावले. त्याच्या याच दमदार खेळीच्या जोरावर त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली आहे. हा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech