लंडन : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांना मागे टाकण्याची त्याला या कसोटी मालिकेत नामी संधी मिळणार आहे. २०२३ मध्ये त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने आपल्या फंलदाजीच्या जोरावर आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद २००० धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे चालून आली आहे. यशस्वी जयस्वालने सध्या १९ कसोटी सामन्यांमध्ये ३९ डावांमध्ये ५२.८८ च्या सरासरीने १७९८ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि दहा अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वालने या कसोटी मालिकेत पुढील तीन डावांमध्ये २००० धावांचा टप्पा पूर्ण केला तर तो राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागला मागे टाकून भारतासाठी कसोटीत सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा भारतीय फंलदाज बनणार आहे. द्रविड आणि सेहवाग दोघांनीही ४० डावांमध्ये हा टप्पा गाठला आणि म्हणूनच इंग्लंडमधील आगामी मालिकेत जयस्वालसाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची ही एक नामी संधी आहे.