मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ईडी कार्यालयात पोहोचला आहे. जिथे त्यांची ऑनलाइन बेटिंग ऍप प्रकरणासंदर्भात चौकशी सुरू आहे. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. आणि ऑनलाइन बेटिंग ऍप ‘वनएक्सबेट’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात त्याचा जबाब नोंदवला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, उथप्पा सोमवारी सकाळी ११ वाजता एजन्सीच्या कार्यालयात पोहोचला आणि संध्याकाळी ७:३० वाजता निघून गेला.
यापूर्वी, एजन्सीने या प्रकरणासंदर्भात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची चौकशी केली होती. अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस माजी खासदार मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेता सोनू सूद यांना याच प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या संदर्भात ईडीकडून युवराज सिंगची चौकशी सुरू आहे. यानंतर २४ सप्टेंबर रोजी ईडी अभिनेता सोनू सूदचीही चौकशी करण्यात येणार आहे.
अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर अन्वेशी जैन देखील दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालय मुख्यालयात पोहोचली. जिथे तिला १xBet सारख्या बेकायदेशीर बेटिंग ऍप्सशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली. ईडी या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची चौकशी करत आहे जेणेकरून या ऍप्सचा प्रचार करण्यासाठी त्यांच्याशी कसे संपर्क साधला गेला, पेमेंट पद्धत कशी होती आणि पेमेंट भारतात किंवा परदेशात केले गेले की नाही हे निश्चित केले जाऊ शकेल.
कंपनीच्या मते, ‘वनएक्सबेट’ हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बेटिंग ऍप आहे ज्याला बेटिंग व्यवसायात १८ वर्षांचा अनुभव आहे. ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर बेट लावू शकतात. कंपनीची वेबसाइट आणि ऍप ७० भाषांमध्ये उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांत एजन्सी अधिक खेळाडू आणि सेलिब्रिटींची चौकशी करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने अलीकडेच रिअल-मनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे.