देशभरातून तब्बल ३०० संत सहभागी होणार
नाशिक : अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय परिषद दिनांक ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे ३०० संत, साधु आणि धार्मिक नेते या परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहेत. परिषद दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने सुरू होईल. दोन दिवसांची ही परिषद सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालणार आहे.
परिषदेसाठी केवळ निमंत्रित व्यक्तींना प्रवेश मिळणार आहे.परिषदेमध्ये १३ आखाडे, १२७ संप्रदाय आणि १५९ उपसंप्रदायातील साधु, संत, शंकराचार्य, जगद्गुरु रामानंदाचार्य आणि वारकरी संप्रदायातील वरिष्ठ मंडळी सहभागी होणार आहेत. दुसऱ्या दिवशीयावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून संतांशी संवाद साधतील आणि कुंभमेळ्याच्या विकासकामांसंबंधी तसेच साधु-संतांच्या सूचनांनुसार उपाययोजना करण्याबाबत चर्चा करतील.
राष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेली प्रमुख व्यक्तिमत्वे: महामंडलेश्वर जनार्दन हरिजी, महामंडलेश्वर मनमोहनदास राधे राधे बाबा, श्री अशोक तिवारी, केंद्रीय संयुक्त महामंत्री विश्व हिंदू परिषद, जगद्गुरु वल्लभाचार्य जी, श्री वल्लभरायजी महाराज, महंत राजेंद्रदासजी, स्वामी जीतेंद्रानंद सरस्वती जी, राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू अविचल देवाचार्य जी, तसेच अनेक नामवंत संत व महंत सहभागी असतील.
आज राष्ट्रीय संत समितीचे महामंत्री स्वामी जीतेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, महापौर हिमगौरीताई आडके, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, विश्व हिंदू परिषदचे माधवदास महाराज राठी, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष अधिकारी संदीप जाधव यांनी परिषदेच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेतली.