सोलापूर : महाराष्ट्राला पंढरपुरातील आषाढी यात्रेचे वेध लागले आहेत. या वर्षभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आषाढी यात्रा काळात ही आरोग्य विभागातर्फे खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली आहे.
आषाढी यात्रेची तयारी राज्य पातळीवरून सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच सचिव दर्जाचे अधिकारी व्हीसीद्वारे वारंवार तयारीबाबत आढावा घेत आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही प्रशासकीय पातळीवर सर्व सुविधांची तयारी सुरू केली आहे. पालखी मार्गावरून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबरोबर निवारा व आरोग्य याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग संबंधित ग्रामपंचायतीमार्फत या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन उपाय योजनेबाबत आवश्यकता सुचना केल्या आहेत.
पालखी मार्गावर पाणीपुरवठ्यासाठी झेडपीचा पंढरपुरात नियंत्रण कक्ष
आषाढी यात्रा काळात पालखी मार्गावर वारकऱ्यांना पुरेसा पाणी पुरवठा करणेकामी पंढरपुरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून यासाठी नियंत्रण अधिकारी व सहा. कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जाहीर केले आहे. जिल्हा परिषद सोलापूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने आषाढी यात्रा पालखी मार्गावर वारकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा करणे व त्यात काही अडचणी येऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पंढरपूर येथे नियत्रण कक्ष स्थापन केला आहे. यासाठी एकूण १० पालखी मार्गावरील टँकर भरण्याच्या एकूण १०७ ठिकाणचा आढावा घेऊन १४२ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली. पालखी मार्गावरील एकुण नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या १४२ इतकी आहे. पालखी मार्गावरील टॅंकर भरण्याचे एकूण ठिकाण १०७ इतके आहेत.