– सर्व आपत्कालीन यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश – गृह मंत्रालयाच्या सूचना
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना बुधवार ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. राज्यांनी पोलिस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मॉक ड्रिलमध्ये बॉम्बस्फोट, शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य प्रतिसाद देण्यासाठी हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे, नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे, हल्ल्याच्या वेळी शहर/क्षेत्र ‘ब्लॅकआउट’ करणे (लाईट बंद ठेवणे), महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया, हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव आदी गोष्टींचा सराव केला जाणार आहे.
ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील फिरोजपूर छावणीत ४ मे रोजी ३० मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल पार पडला. रात्री ९ ते ९.३० या वेळेत लाईट बंद ठेवून युद्धाच्या परिस्थितीतील सज्जतेचा आढावा घेण्यात आला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण खात्याचे सचिव राजेश कुमार सिंह यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना भेटले होते. त्यामुळे संरक्षण खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईची मोकळीक दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एखादी महत्त्वाची घटना घडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या आधी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात अशा प्रकारचा मॉक ड्रिल करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच देशपातळीवर अशा व्यापक स्तरावर युद्धजन्य स्थितीचा सराव होणार आहे.