लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला

0

साना : येमेनच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या एका व्यावसायिक जहाजावर रविवारी(दि.६) सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.हल्लेखोरांनी जहाजावर गोळ्या आणि रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPGs) डागले. प्रत्युत्तरादाखल, जहाजावरील सशस्त्र सुरक्षा पथकानेही गोळीबार केला, अशी माहिती ब्रिटिश लष्करी गटाच्या हवाल्याने दिली. अलिकडच्या काही महिन्यांत, येमेनच्या हुथी बंडखोर गटाने या प्रदेशातील अनेक व्यावसायिक आणि लष्करी जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. गाझा पट्टीमध्ये हमासवर इस्रायलच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हे हल्ले करत असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान, हुथींनी १०० हून अधिक व्यापारी जहाजांना लक्ष्य केले, त्यापैकी दोन बुडाले आणि चार खलाशांचा मृत्यूही झाला. हुथी हल्ल्यांमुळे लाल समुद्राच्या कॉरिडॉरमधून होणाऱ्या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी या जलमार्गावरून सुमारे १ ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या वस्तू जातात, परंतु वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे व्यापारात मोठी घट झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होतोय. लाल समुद्राचा हा भाग केवळ धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर जागतिक व्यापारासाठी जीवनरेखा देखील आहे, त्यामुळे जग येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech