ढाका : बांगलादेशातील ढाका येथील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज कॅम्पसमध्ये हवाई दलाचे चीननिर्मित एफ-७ बीजीआय प्रशिक्षण विमान कोसळून २० जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवारी(दि.२१) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. बांगलादेशी सैन्याने सांगितले की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. वैमानिकाने विमान लोकवस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शाळेशी आदळले. हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. या विमान दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीहि तीव्र दु:ख व्यक्त केले असून, भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे म्हटले आहे. या अपघाताने धक्का बसला. मृतांमध्ये अनेक विद्यार्थी आहेत, असे मोदी म्हणाले.
या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये १६ विद्यार्थी, २ शिक्षक आणि पायलटचा समावेश आहे. आणखी एका मृताची माहिती अद्याप उपलब्ध नाही. १७१ हून अधिक लोक जखमी आहेत. ६० हून अधिक जखमींना बर्न इन्स्टिट्यूटमध्ये रेफर करण्यात आले आहे. २५ हून अधिक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. किरकोळ जखमी झालेल्या अनेकांवर उत्तरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बांगलादेश सरकारने मंगळवारी (दि. २२) एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. या दिवशी बांगलादेश व त्याच्या विदेशातील दुतावासांमध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर राहील. मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी दुर्घटनेतील मृत व जखमींबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.अपघात झाला तेव्हा शाळेत वर्ग सुरू होते आणि शेकडो विद्यार्थी तिथे उपस्थित होते.