सीमा वादावर भारत-चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार
नवी दिल्ली : भारत सरकारने चिनी परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याची आणि त्यावेळी सीमा वादावर होणाऱ्या चर्चेला दुजोरा दिला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या निमंत्रणावरून चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिटब्युरोचे सदस्य आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील वांग यी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील.
वांग यी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चोवीसाव्या फेरीची बैठक होणार आहे. या बैठकीत चीनकडून विशेष प्रतिनिधी म्हणून वांग यी सहभागी होतील, तर भारताचे प्रतिनिधित्व एनएसए अजित डोभाल करतील. यासोबतच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील वांग यी यांच्या भारत दौऱ्याची माहिती देणारे निवेदन जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, सीपीसी केंद्रीय समितीचे राजकीय ब्युरो सदस्य, परराष्ट्र मंत्री आणि चीन-भारत सीमा वादावर चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारत दौऱ्यावर असतील. भारताच्या निमंत्रणावरून चीन आणि भारत यांच्यातील सीमा वादावर विशेष प्रतिनिधींची चोवीसावी फेरी पार पडणार आहे.
वांग यी यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करताना अमेरिका ने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले आहे. भारताने ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर टीका केली असून हे टॅरिफ अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या टॅरिफ जाहीर केल्यानंतर लगेचच भारतीय एनएसए अजित डोभाल यांनी रशियाचा दौरा केला. त्यानंतर डोभाल यांनी चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांना सीमा वादावर चर्चा करण्यासाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले, जे वांग यी यांनी स्वीकारले.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. ही परिषद ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान तियानजिन शहरात होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा मागील चीन दौरा जून २०१८ मध्ये झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते. मात्र, पूर्व लडाखमधील सीमावादामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर सीमावरील तणाव कमी झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील कजान शहरात मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. या बैठकीत दोन्ही देशांतील विविध मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.