– उत्तराधिकारीच्या चर्चेला पूर्णविराम
धर्मशाळा : तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरू १४ वे दलाई लामा तेनजिन ग्योत्सो यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त मॅक्लिओड गंज येथे दोन दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम आजपासून सुरू झाला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या उत्तराधिकारी संदर्भातील चर्चेला पूर्णविराम देत स्पष्ट संदेश दिला – “माझ्यासोबत अवलोकितेश्वरांचे आशीर्वाद आहेत. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले असून, आणखी ३०-४० वर्षे जगण्याची आशा आहे.” दलाई लामा म्हणाले, “आपण आपला देश गमावला असला तरी भारतात निर्वासित जीवन जगताना मी अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकलो. धर्मशाळेत शक्य तितक्या लोकांची सेवा करण्याचा माझा मानस आहे.”
या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून हजारो अनुयायी उपस्थित झाले आहेत. ४८ देशांतील बौद्ध अनुयायांनी धर्मशाळेत येऊन सहभाग नोंदवला आहे. मुख्य तिबेटी मंदिर त्सुगलागखांग येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, जेथे दलाई लामांचे निवासस्थानही आहे. दलाई लामा यांचा अधिकृत वाढदिवस रविवार, ६ जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून मॅक्लिओड गंज मंदिर परिसर भव्य पद्धतीने सजवण्यात आले आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, तसेच हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आदी मान्यवर उपस्थित होते. रिजिजू म्हणाले, “दलाई लामा यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली असून, त्यांच्या उपस्थितीत सहभागी होणं हे गौरवचं आहे.” दरम्यान, चीनने दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीविषयी वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती आणि भारताला तिबेट विषयावर ‘सावधगिरी’ बाळगण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर रिजिजू यांचा दौरा आणि उपस्थिती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.