इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट

0

वॉशिंगटन : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांच्या महत्वकांशी स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान SpaceX च्या संशोधन केंद्रात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आकाशात ज्वालामुखीसारख्या उंच ज्वाला पहायला मिळाल्या. स्टारशिप ३६ च्या फायर टेस्टिंगदरम्यान हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील टेक्सास शहरात असलेल्या स्पेसएक्सच्या बेसवर हा स्फोट झाला. प्रक्षेपणादरम्यान रॉकेटच्या इंजिनमध्ये स्फोट झाला असल्याचं सांगितले जात आहे. या स्फोटामुळे स्टारशिप प्रोटोटाइपचे मोठे नुकसान झाले. या अपगातामुळे सर्व प्रक्षेपण कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावे लागले आहेत. दरम्यान, या स्फोटात जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. येत्या २९ जून रोजी स्पेसएक्स त्यांचे पुढील स्टारशिप उड्डाण सुरू करण्याची योजना आखत होती. जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठ्या रॉकेटची ही १० वी चाचणी असती. पण, आता आजचा स्फोट स्पेसएक्सच्या स्टारशिप कार्यक्रमासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय. या वर्षाच्या सुरुवातीलाही स्टारशिप चाचणी उड्डाणादरम्यान रॉकेट हवेत फुटले होते.

इलॉन मस्कची स्पेसएक्सची स्टारशिप ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेद्वारे मानवांना इतर ग्रहांवर वसवण्याचे मोठे ध्येय ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत चंद्रावर उतरल्यानंतर मंगळावर अंतराळयान पाठवण्याची योजना आहे. दूरच्या अंतराळ मोहिमांसाठी हे महाकाय रॉकेट खूप महत्वाचे आहे. सतत अडचणी येत असतानाही स्पेसएक्सने त्यांच्या स्टारशिप कार्यक्रमातून माघार घेतलेली नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech