गांधीनगर : गुजरात एटीएसने अल-कायदाशी संबंधित चार संशयित
दहशतवाद्यांना अटक केली आहे. या चारपैकी दोन जणांना गुजरातमधून, एकाला दिल्लीमधून आणि एकाला नोएडामधून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने झीशान, फर्दीन, सैफुल्ला आणि फारिक या चौघांना अटक केली असून या आरोपींचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.हे सर्वजण अल-कायदाच्या विचारसरणीचा प्रसार करत होते आणि काही काळापासून सक्रिय होते. गुजरात एटीएसला या प्रकरणात एक गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर सखोल चौकशी आणि एक विशेष ऑपरेशन राबवून त्यांना अटक करण्यात आली.
एटीएसच्या माहितीनुसार, हे दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आपल्या गटात सामील करत होते आणि त्यात अल-कायदाचे प्रचार करत होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती, असा दावा करण्यात येत आहे. चौकशीत असेही आढळले की हे सर्वजण गुजरातमधील दहशतवादी हालचालींवर चर्चा करत होते आणि या अनुषंगानेच त्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने या चारही संशयितांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. हे चार जण गुजरातमध्ये दहशतवादी साजिश रचत होते, आणि वेळीच हस्तक्षेप करून मोठा धोका टाळण्यात गुजरात एटीएस यशस्वी ठरली आहे. यामुळे गुजरात एटीएसची ही कारवाई एक मोठी यशस्वी मोहीम मानली जात आहे.