नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी हेल्पलाइन जारी; विमानसेवा बंद, सीमेवर सतर्कता

0

काठमांडू : नेपाळमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि हिंसाचार सुरू आहे. या पार्शवभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ९ सप्टेंबर रोजी एक निवेदन जारी करत स्थानिक सुरक्षा सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला असून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदननुसार, “नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीला पाहता, भारतीय नागरिकांनी परिस्थिती स्थिर होईपर्यंत नेपाळचा प्रवास टाळावा. सध्या नेपाळमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सल्ला दिला जातो की, त्यांनी आपल्या सध्याच्या निवासस्थानीच थांबावे, रस्त्यांवर जाणे टाळावे आणि पूर्ण सावधगिरी बाळगावी. त्यांना नेपाळच्या अधिकाऱ्यांबरोबरच काठमांडूमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या स्थानिक सुरक्षा सल्ल्यांचे पालन करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन मदतीच्या गरजेसाठी, खालील हेल्पलाइन नंबरवर भारतीय दूतावास, काठमांडूशी संपर्क साधावा +977-980 860 2881 (व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठीही उपलब्ध) +977-981 032 6134 (व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठीही उपलब्ध)

नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमुळे काठमांडू विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी मंगळवारी(दि.९) काठमांडू जाणाऱ्या आपल्या फ्लाइट्स रद्द केल्या आहेत.नेपाळ एअरलाईन्सनेही दिल्लीहून काठमांडूसाठी मंगळवारी होणारी फ्लाइट रद्द केली आहे.एअर इंडिया आणि स्पाइसजेटने बुधवारीसाठी काठमांडूहून येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने सांगितले की, सध्याच्या परिस्थिती आणि काठमांडू विमानतळ बंद असल्यामुळे, १० सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.एक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एअर इंडियाची एक फ्लाइट परत दिल्लीमध्ये परत आली, कारण विमान काठमांडू विमानतळावर उतरू शकले नाही.

भारत सरकारने सीमा भागात चौकशी आणि गस्त वाढवली आहे. उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किम या राज्यांमध्ये भारत-नेपाळची १,७५१ किलोमीटर लांब खुली सीमा आहे, जी दोन्ही देशांमधील नागरिकांना अप्रतिबंधित आवाजाहीची परवानगी देते. ही व्यवस्था दोन्ही देशांमधील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देते. मात्र, नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता किंवा आंदोलन सुरू झाल्यावर हीच सीमा कडक सुरक्षा उपायांची गरज निर्माण करते.त्यामुळे सध्या या सीमांवर कडक गस्त आणि तपासणी सुरू करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech