नवी दिल्ली : प्रसिद्ध चित्रपटकार आणि साहित्यिक सत्यजित रे यांचे बांगलादेशातील मयमनसिंग येथील वडिलोपार्जित घर पाडण्याच्या निर्णयावर भारत सरकारने चिंता व्यक्त करत बांगलादेश सरकारला पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात या घराचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत ते साहित्य संग्रहालय वा संयुक्त सांस्कृतिक वारसा केंद्र म्हणून जपण्याचा प्रस्ताव मांडला. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही इमारत सत्यजित रे यांचे आजोबा आणि बंगाली साहित्य व चित्रकलेतील मान्यवर व्यक्तिमत्व उपेंद्रकिशोर रे चौधरी यांचे घर होते. ‘बंगाली सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक’ असलेल्या या वास्तूच्या दुरुस्ती व जतनासाठी भारत सरकार मदतीस तयार असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या मुद्द्यावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत बांगलादेश सरकारला हे वारसास्थळ जपण्याचे आवाहन केले. “ही इमारत बंगालच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहे. बांगलादेशातील जनतेने आणि सरकारने तिचे रक्षण करावे,” असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले. बांगलादेशच्या बाल व्यवहार विभागाचे अधिकारी मोहम्मद मेहदी जमान यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, हे घर पूर्वी बाल अकादमी म्हणून वापरले जात होते. मात्र, त्याची अवस्था धोकादायक झाल्याने ते पाडून अर्ध-काँक्रीट इमारत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येथे शैक्षणिक उपक्रम राबवण्याची योजना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्यजित रे यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कोलकात्यात झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पथेर पांचाली’ (१९५५), ‘अपराजितो’ (१९५६) आणि ‘अपूर संसार’ (१९५९) या ‘अपू ट्रायलॉजी’ने जागतिक स्तरावर बंगाली चित्रपटांना मान्यता मिळवून दिली. त्यांनी ३७ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि अनेक चित्रपटांसाठी स्वतः संगीत व संवादही लिहिले. १९९२ मध्ये त्यांना ऑस्करचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरवले. भारत आणि बांगलादेश दोन्ही देशांचे सांस्कृतिक मुळे एकत्र विणलेली आहेत. सत्यजित रे यांचे वडिलोपार्जित घर हे फक्त वास्तू नाही, तर एक सांस्कृतिक स्मारक आहे. भारताच्या पाठोपाठ आता बांगलादेश सरकारनेही या वास्तूचा ऐतिहासिक व भावनिक संदर्भ लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी व्यापक मागणी होत आहे.