परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : इरणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात येतेय. यातंर्गत आतापर्यंत १११७ भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. उर्वरित लोकांना देखील आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत दिली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत पहिल्या टप्प्यात इराणमधून ११० भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आले. त्यानंतर २० जून रोजी २९० भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले. तर, शनिवारी २१ जून रोजी पहाटे ११७ भारतीयांना घेऊन विशेष विमान डेरेदाखल झाले.
दुपारी ४.३० वाजता इराणमधून ३१० भारतीय नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत एक विमान दाखल झाले. तसेच शनिवारी रात्री २९० भारतीयांना घेऊन तिसरे विमान भारतात पोहचले. त्यामुळे ऑपरेशन सिंधू अंतर्गत बाहेर काढण्यात आलेल्या लोकांची एकूण संख्या १११७ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची ही पाचवी तुकडी आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत एका विशेष विमानाने इराणहून भारतात आलेल्या भारतीय नागरिकाने सांगितले की ते खूप चांगले वाटत आहे. तिथे क्षेपणास्त्रे डागली जात होती. आम्हाला भीती वाटली. आम्ही एक आठवडा तिथे अडकलो होतो.