नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अॅपलचे सीईओ टिम कुक यांना आयफोनचे उत्पादन भारतातून अमेरिकेत हलवण्याचे आवाहन केले होते. मात्र, अॅपलने ट्रम्प यांच्या या इशाऱ्याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. ओमडिया रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, एप्रिल २०२५ मध्ये अॅपलच्या पुरवठादार कंपन्यांनी भारतातून अमेरिकेत तब्बल २९ लाख आयफोन निर्यात केले आहेत. ही आकडेवारी मागील वर्षीच्या तुलनेत ७६ टक्क्यांनी वाढलेली आहे.
ओमडियाने रिसर्च फर्मने म्हटले आहे की,चीनमधून अमेरिकेत गेलेले आयफोन युनिट्सचे प्रमाण मात्र घसरणीला लागले आहे.एप्रिलमध्ये अमेरिकेत चीनी आयफोन निर्यात ७६% ने कमी होऊन ९ लाख युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी ३७ लाख युनिट्स होती. काउंटरपॉइंट रिसर्चच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार एप्रिलमध्ये अमेरिकेत भारतीय आयफोन निर्यात २९ ते ३० लाख युनिट्स दरम्यान होती. दरम्यान, अॅपलने जर अमेरिकेत आयफोनची असेंब्ली लाईन स्थलांतरित केली, तर कामगार खर्च, सुटे भाग आणि पुरवठा साखळीतील गुंतागुंत लक्षात घेता आयफोन प्रो मॉडेल्सची किंमत १,११९ डॉलरवरून थेट ३,००० डॉलरपेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्याचे टीएफ सिक्युरिटीजचे अॅपल विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अमेरिकेत उत्पादनापेक्षा आयात करून २५ टक्के टॅरिफ सहन करणे हे अॅपलसाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे ते म्हणाले.
भारतात आयफोन एक्सपर्ट अॅपलची भागीदार कंपनी फॉक्सकॉननेही उत्पादन क्षमतेत मोठी वाढ करत चेन्नईतील कारखान्याचा विस्तार करण्यासाठी १.५ अब्ज युरोंची गुंतवणूक जाहीर केली आहे. तसेच कर्नाटकमधील नव्या कारखान्यातून जूनपासून आयफोनचे उत्पादन आणि डिलिव्हरी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच अॅपलला इशारा दिला होता की, जर त्यांनी आयफोनची निर्मिती अमेरिकेत न करता त्याची आयात केली तर त्यावर २५% कर लागू करण्यात येईल. पण अॅपलने अमेरिकेत आयफोन निर्मिती सुरू केल्यास, आयफोनच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.