नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये जबसदस्त पराभव होऊनही पाकिस्तानच्या कुरापती कायम आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्थ आयएसआयने युद्धबंदीच्या घोषणेनंतर, खलिस्तान समर्थकांना चिथावणी देण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून भारतात मोठी दहशतवादी घटना घडवता येईल. आयएसआय कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा (एसएफजे) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू आणि इतर खलिस्तानी दहशतवाद्यांकडून मदत घेत आहे. पन्नूच्या माध्यमातून पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचे काम सुरू झाले आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतातील पोलिस ठाणी, सैन्य आणि सरकारी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा आहे. गेल्या काही दिवसांत, कट रचण्यासाठी एक नवीन पद्धत दिसून आली आहे.फरार खलिस्तानी दहशतवादी आता पुन्हा भारतात येऊ लागले आहेत, जेणेकरून येथे मोठी दहशतवादी घटना घडवू शकतील. गुप्तचर संस्थांनी देशातील सर्व सुरक्षा तपास संस्थांना याबद्दल इशारा दिला आहे.यानंतर, एनआयए, पंजाब-दिल्ली-चंदीगड पोलिस आणि इतर राज्यांचे पोलिस सतर्क आहेत. काही राज्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधून चालवले जाणारे खलिस्तान समर्थक सोशल मीडिया अकाउंट ताब्यात घेतले आहेत. ही सर्व खाती बॉटद्वारे चालवली जातात आणि त्यांनी स्वतःला भारतीय असल्याचे दाखवले आहे.ही सोशल मीडिया अकाउंट एखाद्या शीख व्यक्तीची ओळख किंवा बनावट नाव वापरून तयार करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने खलिस्तान समर्थकांना भडकावणारे १०० व्हिडिओ ब्लॉक केले आहेत. दहशतवादी पन्नूचे ५० हून अधिक बॉट सोशल मीडिया अकाउंट देखील बंद करण्यात आले आहेत.