पाटणा : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या एमपी-एमएलए कोर्टाने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात केजरीवाल यांना परदेश प्रवासासाठी परवानगी दिली आहे. केजरीवाल यांचे वकील रूद्र प्रताप सिंह मदन यांनी मंगळवारी (९ सप्टेंबर) सांगितले की, ८ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती, त्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी शुभम वर्मा यांनी आदेश राखून ठेवले होते, आणि नंतर केजरीवाल यांना परदेश जाण्याची परवानगी दिली.
मदन यांनी सांगितले, “या प्रकरणात २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेठीमध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.” त्यावेळी केजरीवाल आम आदमी पार्टीचे उमेदवार कुमार विश्वास यांचा प्रचार करण्यासाठी अमेठीला गेले होते. त्याचवेळी गौरीगंज आणि मुसाफिरखाना पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात आचारसंहितेच्या उल्लंघनाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. केजरीवाल या दोन्ही प्रकरणांमध्ये जामिनावर आहेत. सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणातील सुनावणी स्थगित करण्यात आलेली आहे.
मदन यांनी पुढे सांगितले की, “यापूर्वी कोर्टाने केजरीवाल यांना त्यांच्या पासपोर्टचे नुतनीकरण करण्याची परवानगी दिली होती, पण अट घातली होती की परदेश प्रवासापूर्वी कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक असेल.” त्यांनी पुढे सांगितले, “आज आम्ही कोर्टाकडे ही अट रद्द करण्याची विनंती केली, कारण त्यांना तातडीने परदेश प्रवास करायचा आहे. सुनावणी झाली आणि आदेश राखून ठेवण्यात आला होता, जो नंतर त्यांच्या बाजूने दिला गेला.”