मुंबई विमानतळावर युगांडाच्या नागरिकाकडून ८.६६ कोटींचे कोकेन जप्त

0

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने कारवाई करत एका युगांडाच्या नागरिकाला अटक केली आहे. या व्यक्तीच्या पोटातून तब्बल ८६६ ग्रॅम संशयित कोकेन जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारभावाची किंमत सुमारे ८.६६ कोटी इतकी आहे. कस्टम्सचे आयुक्तालय, मुंबई झोन-III अंतर्गत कार्यरत असलेल्या एअरपोर्ट कमिशनरेटने ही कारवाई केली. संबंधित प्रवासी युगांडामधील एन्टेब्बे येथून मुंबईत दाखल झाला होता. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी थांबवले. वैद्यकीय तपासणीत त्याच्या पोटात अंमली पदार्थ असण्याची शक्यता आढळल्यानंतर त्याला तात्काळ जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले.

२४ ते २५ मार्चदरम्यान त्याच्या पोटातून एकूण ८० ओव्हल-आकाराच्या कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या. या कॅप्सूल्समध्ये कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान जप्त केलेल्या कोकेनचे वजन ८६६ ग्रॅम असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ८.६६ कोटी इतकी आहे. प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून, या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी रॅकेटशी संबंध आहे का, याचा शोध कस्टम्स विभाग घेत आहे. ही कारवाई मुंबई कस्टम्स विभागाच्या दक्षतेचा व अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग आहे. सुरक्षा यंत्रणा विमानतळावर सतर्क असून, अशा प्रकारच्या घटनांवर कठोरपणे कारवाई करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech