काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधातील वाढत्या आंदोलनामुळे रूपनदेही जिल्ह्यातील भैरहवा आणि बुटवल या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने कर्फ्यू लागू केला आहे. यामुळे नेपाळ सीमाशुल्क कार्यालय बंद करण्यात आले आहे आणि भारत-नेपाळ सीमेवरील सोनौली बॉर्डरवर वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे सीमेवर सुमारे ४ किमी लांब ट्रॅफिक निर्माण झाले आहे आणि भारतीय पर्यटकांना सीमेवरच अडवण्यात येत आहे. नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याच्या विरोधात काठमांडू आणि पोखरानंतर आता रूपनदेही जिल्ह्यातील भैरहवा आणि बुटवलमध्येही हिंसक आंदोलन उसळले आहे. मुख्य जिल्हाधिकारी टोकराज पांडेय यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत धारा 6A 2028 अंतर्गत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
कर्फ्यूचे क्षेत्र- बुटवल भाग: पूर्व: पेट्रोल पंप व धागा फॅक्टरी पुल, पश्चिम: बेलवास चौक, उत्तर: चिडीया नदी,दक्षिण: मंगलपूर, भैरहवा भाग: पूर्व: रोहिणी नदी पूल, पश्चिम: बेथरी ब्रिज,उत्तर: बुद्ध चौक,दक्षिण: मेथादिहावा, बुटवल-बेलहिया रस्ता:रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १०० मीटर परिसरात कर्फ्यू लागू आहे. या कर्फ्यू अंतर्गत कुठल्याही प्रकारची सभा, मोर्चा, आंदोलन, बैठक, एकत्र येणे किंवा घेराव यावर पूर्ण बंदी आहे. नेपाळमधील अशांततेमुळे सोनौली बॉर्डरवर सशस्त्र सीमा बल (एसएसबी) ची 66 वी बटालियन आणि स्थानिक पोलीस यांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. नो मॅन्स लँडवर एसएसबी ची 22 वी बटालियन नेपाळहून येणाऱ्या प्रवाशांची कठोर तपासणी करत आहे. डॉग स्क्वॉड टीम्स बस स्टँड, टॅक्सी स्टँड आणि हॉटेल्समध्ये लावारस सामान आणि वाहनांची तपासणी करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पायदळ गस्त वाढवण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी ४ नंतर सुमारे ७०० भारतीय पर्यटकांना सीमेवरून परत पाठवण्यात आले. भंसार कार्यालय बंद असल्यामुळे ट्रक व इतर वाहने सीमेवर अडकून पडली आहेत. सोनौली बॉर्डरवर सुमारे ४ किमी लांब ट्रॅफिक जाम आहे. नेपाळमध्ये लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूमुळे अनेक भारतीय पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून, नेपाळ पोलीस त्यांना सुरक्षित भारतात पाठवत आहेत.