नवी दिल्ली : फरार उद्योगपती नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सीबीआय आणि ईडीच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या भावाला अमेरिकन अधिकाऱ्यांनी ४ जुलै रोजी अटक केली. अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थातच सीबीआयने संयुक्तपणे केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर ही अटक करण्यात आली आहे.
अमेरिकन अभियोक्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्रत्यार्पणाची कार्यवाही दोन प्रकरणांमध्ये सुरू आहे. एक म्हणजे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीएमएलए, २००२ च्या कलम ३ अंतर्गत मनी लाँड्रिंगचा आणि दुसरा भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब आणि २०१ अंतर्गत गुन्हेगारी कट रचण्याचा आहे. नेहल मोदीच्या प्रत्यार्पणाच्या सुनावणीची पुढील तारीख १७ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्या दिवशी अमेरिकन न्यायालयात स्टेटस कॉन्फरन्स होईल. नेहल मोदी जामीन अर्ज दाखल करेल अशी अपेक्षा आहे. पण अमेरिकन सरकारचे वकील त्याला विरोध करतील. भारत सरकार नेहल मोदीला लवकरात लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्याच्यावर देशाच्या कायद्यानुसार खटला चालवता येईल.
भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांपैकी एक पंजाब नॅशनल बँक घोटाळा या प्रकरणात नेहल मोदी आरोपी आहे. त्याचा भाऊ नीरव मोदीसाठी काळा पैसा पांढरा करण्यात आणि लपवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात उघड झाले आहे. ईडी आणि सीबीआयच्या तपासात असेही आढळून आले आहे की, नेहल मोदीने अनेक शेल कंपन्यांद्वारे परदेशात मोठ्या प्रमाणात पैसा हस्तांतरित केला. आणि त्याचा उद्देश फसवणुकीद्वारे कमावलेले पैसे ट्रॅकपासून दूर ठेवणे हा होता.