अजित डोभाल यांचे परदेशी माध्यमांना खुले आव्हान
चेन्नई : पाकिस्तानच्या विरोधातील ऑपरेश सिंदूर दरम्यान भारताच्या कुठल्या भागात नुकसान झाले याचा एक तरी फोटो किंवा व्हिडीओ दाखवा असे आव्हान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी परदेशी माध्यमांना दिले. आयआयटी मद्रासच्या ६२ व्या पदवीदान समारंभात डोभाल बोलत होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान भारताचे नुकसान झाल्याचा अपप्रचार परदेशी माध्यमांनी सुरू केला आहे. यापार्श्वभूमीवर डोभाल म्हणाले की, भारताच्या कुठल्याही भागात नुकसान झाल्याचा एक ठोस पुरावा दाखवावा. नुकसान झाल्याचा एक फोटो किंवा फुटलेला एखादा काचेचा तुकडा तरी दाखवावा असे आव्हान डोभाल यांनी दिले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये अवघ्या २३ मिनिटांत भारताने ९ लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. हे हल्ले इतके अचूक होते की, लक्ष्य वगळता इतर कुठलेही नुकसान झाले नाही. परंतु, न्यूयॉर्क टाईम्सने जे काही लिहिले, त्यांनी काही उपग्रह छायाचित्रं दाखवली, ती सुद्धा पाकिस्तानातील १३ एअर बेसची होती. मग भारतात झालेल्या नुकसानाचा पुरावा कुठे आहे? असा सवाल डोभाल यांनी उपस्थित केला. यावेळी डोभाल यांनी ऑपरेशनसाठी वापरलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचेही विशेष कौतुक केले. भारताने वापरलेली यंत्रणा पूर्णतः स्वदेशी होती, आणि हे एक मोठे यश असल्याचे डोभाल यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून नंतर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतीय वायु संरक्षण प्रणालीने सर्व हल्ले अयशस्वी केले.यानंतर भारताने ११ पाकिस्तानी हवाई तळांवर अचूक हल्ले करून मोठा संदेश दिला. हे ऑपरेशन आधुनिक भारताच्या लष्करी क्षमतेचा एक निर्णायक टप्पा मानला जातो. डोभाल यांनी या भाषणातून भारताच्या स्वसंरक्षण क्षमतेचा आत्मविश्वास दाखवताना परदेशी माध्यमांच्या पक्षपाती वृत्तीचा खरपूस समाचार घेतला. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक सैनिकी कारवाई नव्हते, तर भारतीय तंत्रज्ञान, नियोजन आणि अचूकतेचा जागतिक स्तरावरचा परिचय होते, असे डोभाल यांनी यावेळी नमूद केले.