ढाका : बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशातील राजकीय परिस्थिती आणि त्यात सुरू असलेल्या घडामोडी यामुळे युनूस चिंतेत आहेत. अशा वातावरणात आपल्याला उत्तम काम करता येईल का, याबाबत युनूस यांना शंका असल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच युनूस यांनी देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याचे म्हटले होते. यानंतर आता बांगलादेश आर्मीने युनूस यांच्या एका प्रस्तावावर जोरदार आक्षेप घेत इशारा दिला आहे.
ढाका येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट कर्नल शफीकुल इस्लाम यांनी म्यानमारच्या राखीन प्रांतात तथाकथित कॉरिडॉर सुरू करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आणि बांगलादेश आर्मी या प्रकरणात तडजोड करणार नाही असे सांगितले. कॉरिडॉर, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी संबंधित मुद्द्यांवर आर्मी तडजोड करणार नाही. ५ ऑगस्ट २०२४ देशाच्या हितासाठी आर्मीने सर्वांशी समन्वय साधला आहे, असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडियर जनरल नाझीम उद दौला म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य, सुरक्षा किंवा सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यावेळी पत्रकारांनी युनूस सरकार आणि आर्मीतील संघर्षाबाबत प्रश्न विचारले. यावर बोलताना, बांगलादेश आर्मी आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. सर्वांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढू नये. सरकार आणि बांगलादेश आर्मीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र काम करत आहोत. प्रत्येक पावलावर एकमेकांना पूरक आहोत, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बांगलादेश आर्मी आणि सरकार एकाच कुटुंबाचे भाग आहेत. मात्र, ही फूट पडण्याची चिन्हे नाहीत. ते प्रक्रियेचा भाग आहे, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे बांगलादेशची आर्थिक व सामाजिक स्थिती दिवसेंदिवस खालावल्याचे म्हटले जात आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरोधात सामान्य नागरिक व शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी ढाक्याची स्थिती बिकट झाली आहे. ढाक्यात प्रामुख्याने आंदोलने होत असल्याने सरकारची चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे.