भारत घाईघाईने किंवा बंदुकीच्या धाकावर व्यापार करार करत नाही – पीयूष गोयल

0

टोकियो/ नवी दिल्ली : “भारत कोणत्याही व्यापार करारात घाईत किंवा बंदुकीच्या धाकावर स्वाक्षरी करत नाही”, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी जर्मनीत बोलताना सांगितले. ते त्यांनी स्पष्ट केलं की, भारत युरोपियन युनियन (ईयू) आणि अमेरिका यांसह इतर देश व प्रदेशांसोबत व्यापार करारांवर सक्रियपणे चर्चा करत आहे. जर्मनीतील ‘बर्लिन डायलॉग’ दरम्यान बोलताना पीयूष गोयल म्हणाले, “आम्ही युरोपियन युनियनसोबत सक्रिय चर्चा करत आहोत. आम्ही अमेरिकेशीही संवाद साधत आहोत. पण आम्ही कोणताही करार घाईघाईत करत नाही, आणि कोणतीही अंतिम मुदत ठरवून किंवा बंदुकीच्या धाकावर करार करत नाही.”

बर्लिन ग्लोबल डायलॉगमध्ये बोलताना गोयल यांनी यावर भर दिला की, “व्यापार करार हे केवळ टॅरिफ (शुल्क) किंवा बाजारपेठ प्रवेशाबद्दल नसतात, तर ते परस्पर विश्वास, दीर्घकालीन संबंधांची उभारणी, आणि जागतिक व्यापार सहकार्याच्या शाश्वत चौकटीच्या निर्मितीबद्दल असतात.” भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या करारात बाजार प्रवेश, पर्यावरणीय निकष आणि उत्पादनाच्या नियमांबाबत मतभेद आहेत. गोयल यांनी सांगितले की भारत व्यापार करारांमध्ये संतुलित दृष्टिकोन अवलंबेल. ते म्हणाले, “भारत कोणत्याही व्यापार करारावर घाईघाईत स्वाक्षरी करणार नाही. त्यांनी पुढे म्हटलं, “व्यापार करारांना दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहायला हवं. भारत कधीही घाईघाईत किंवा भावनेच्या भरात निर्णय घेत नाही.”

गोयल यांनी सांगितले की भारत अतिरिक्त टॅरिफचा सामना करण्यासाठी नव्या बाजारपेठांचा शोध घेत आहे. ते म्हणाले, “मला असं वाटत नाही की भारताने कधीही राष्ट्रीय हिताशिवाय इतर कोणत्याही कारणावरून ठरवलं आहे की त्याचे मित्र कोण असतील… जर कोणी मला सांगतं की भारत युरोपियन युनियनचा मित्र होऊ शकत नाही, तर मी ते स्वीकारणार नाही. किंवा कोणी म्हणतं की मी केनियासोबत काम करू शकत नाही, हे देखील मी मान्य करणार नाही.” या टिप्पण्या विशेषतः महत्त्वाच्या आहेत कारण अमेरिका भारतावर रशियाकडून कच्चं तेल खरेदी थांबवण्यासाठी दबाव आणत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech