नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्टपासून तियांजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (एससीओ ) शिखर परिषदेसाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींची ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोदींचा चीन दौरा भारत-चीन संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट रविवार, ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.
भारत आणि चीनमधील संबंध चढ-उतारांनी भरलेले राहिले असले तरी मोदींच्या या दौऱ्यामुळे संबंधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच चीनने भारताला मदतीचे आश्वासन दिले होते. चीन भारताला बोगदा खोदण्याच्या यंत्रांबरोबरच रेअर अर्थ मटेरियल (दुर्मिळ खनिजे) पुरवणार आहे. भारत आणि चीन यांच्यात १ एप्रिल १९५० रोजी औपचारिक राजनयिक संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र, १९६२ मधील सीमा युद्धामुळे या संबंधांवर मोठा परिणाम झाला. १९८८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चीन दौऱ्याने या संबंधांना नव्याने चालना मिळाली. त्यानंतर २००३ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चीन दौऱ्याने विशेष प्रतिनिधी प्रणाली तयार करण्यात आली. २००५ मध्ये चीनचे तत्कालीन पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी भारताचा दौरा करून द्विपक्षीय धोरणात्मक व सहकार्यात्मक भागीदारीला चालना दिली.
२०१४ मध्ये शी जिनपिंग यांचा भारत दौरा “विकासात्मक भागीदारी”ची पायाभरणी करणारा ठरला, तर २०१५ मध्ये मोदींच्या चीन दौर्याने त्या प्रक्रियेला गती मिळाली. २०१८ मध्ये वुहान आणि २०१९ मध्ये चेन्नई येथे झालेल्या अनौपचारिक शिखर परिषदांमुळे परस्पर विश्वास अधिक दृढ झाला. तथापि, २०२० मध्ये पूर्व लडाखमधील एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) वरील तणावामुळे संबंधांवर वाईट परिणाम झाला. मात्र, २०२४ मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली आणि संबंध पुन्हा सुधारले. भारत आणि चीन यांच्यातील जवळीक अमेरिकेसाठी त्रासदायक ठरू शकते. ट्रम्प यांनी भारतावर नाराजी व्यक्त करत ५०% आयात शुल्क लागू केले आहे, तर चीनला मात्र काही प्रमाणात सूट दिली होती. अशा स्थितीत पंतप्रधान मोदींचा चीन दौरा ट्रम्पसाठी अस्वस्थ करणारा ठरू शकतो.