पोर्ट ऑफ स्पेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो प्रदान करण्यात आल्याने मला सन्मानित वाटत आहे. मी १४० कोटी भारतीयांच्या वतीने तो स्वीकारतो आहे. पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅरिबियन बेट राष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जागतिक नेतृत्व, भारतीय डायस्पोराशी असलेल्या त्यांच्या सखोल संबंध आणि कोविड-१९ साथीच्या काळात त्यांच्या मानवतावादी प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ हा सन्मान मिळाल्याने मला सन्मानित वाटत आहे. मी १४० कोटी भारतीयांच्या वतीने तो स्वीकारतो. ते पुढे म्हणाले की, हा सन्मान आपल्या दोन्ही देशांमधील शाश्वत मैत्रीचे प्रतीक आहे. प्रत्येक पावलावर आपण आपल्या राष्ट्रांमधील सांस्कृतिक संबंध पाहू शकतो. दरम्यान, गुरुवारी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी या पुरस्काराची घोषणा होती. त्यांनी मोदींच्या भेटीला सामायिक अभिमान आणि ऐतिहासिक संबंधाचा क्षण म्हणून वर्णन केले होते. पंतप्रधान म्हणून मोदींचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा पहिलाच दौरा आहे आणि १९९९ नंतर पंतप्रधान पातळीवर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा पहिलाच भारतीय द्विपक्षीय दौरा होता.