नवी दिल्ली : इस्रो आणि नासाच्या मिशन अॅक्सिओम-०४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले शुभांशू शुक्ला सुखरूप परतले. भारत देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. शुभांशू शुक्ला सुखरूपपणे परत येताचा त्यांच्या आई-वडिलांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच शुक्ला यांच्यावर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करत शुभांशू शुक्ला यांचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, अंतराळातील ऐतिहासिक मोहिमेतून पृथ्वीवर परतणाऱ्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे राष्ट्रासोबत स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून शुभांशू शुक्ला यांनी धैर्य आणि समर्पण भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. आपल्या स्वतःच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे – गगनयान, असे आहे. अशी पोस्ट पंतप्रधान मोदींनी यांनी शुभांशु शुक्ला यांचे स्वागत करताना केली आहे.
शुभांशू शुक्ला यांनी पृथ्वीवर परतण्यासाठी २३ तासांचा प्रवास केला आहे. शुभांशू शुक्ला यांच्यासोबत चार अंतराळवीर २५ जूनपासून अंतराळात गेले होते. २६ जून रोजी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे शुभांशू शुक्ला यांनी ६० हून अधिक शास्त्रीय प्रयोग केले. त्यामध्ये अंतराळात स्नायूंचं होणारं नुकसान, मानसिक आरोग्य आणि अंतराळात धान्य रुजवण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. शुभांशू शुक्ला सुखरूप परतताच आई-वडिल्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्यादरम्यान, कॅलिफोर्नियातील समुद्र किनाऱ्याजवळ शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना घेऊन येणारे यान उतरल्यानंतर सर्व अंतराळवीरांना यानातून सुखरूपपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. आता त्यांना सुमारे १० दिवस क्वारेंटाईनमध्ये ठेवले जाणार असून, यादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.