नवी दिल्ली : एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या भारतविरोधी धमक्यांची तीव्र शब्दांत निंदा केली. तसेच, केंद्र सरकारने हा मुद्दा अमेरिकेसमोर प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी केली. ओवैसींनी ट्विटरवर (एक्स) या धमक्यांवर प्रतिक्रिया देताना लिहिले, “पाकिस्तानी लष्करप्रमुखांची भारतविरोधी भाषा आणि धमक्या अत्यंत निंदनीय आहेत. त्यांनी हे अमेरिकेच्या भूमीवरून केले आहे, जे या प्रकरणाला अधिक गंभीर बनवते. सरकारने केवळ परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनावर विसंबून न राहता यावर ठोस राजकीय प्रतिक्रिया द्यावी आणि अमेरिका समोर आपला निषेध नोंदवावा.”
भारत हा अमेरिकेचा एक रणनीतिक भागीदार आहे आणि अमेरिकेच्या भूमीचा असा गैरवापर भारतासाठी आणि भारतीयांसाठी पूर्णपणे अस्वीकार्य आहे. पाकिस्तानच्या लष्करी धोरणांची जाणीव ठेवून आपल्याला आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून संरक्षण क्षेत्रासाठी केले जाणारे कमी बजेटीय वाटप आता चालणार नाही. आपण अधिक चांगली तयारी करणे गरजेचे आहे. असे ओवैसी यांनी म्हंटले आहे. माहितीप्रमाणे, असीम मुनीर यांनी शनिवारी फ्लोरिडा येथील टॅम्पा शहरात पाकिस्तानी प्रवाशांसोबत खासगी रात्रीच्या जेवणादरम्यान भारताविरोधात धमकी दिली होती. मुनीर म्हणाले होते की, “आम्ही एक अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आपण बुडत आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला आपल्या सोबत घेऊन जाऊ.”
मुनीर यांच्या या वक्तव्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं की, भारत अशा अण्वस्त्र धमक्यांसमोर झुकणार नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेच्या दौर्यात दिलेल्या कथित वक्तव्यांची आम्हाला दखल मिळाली आहे. अण्वस्त्रांची धमकी देणे हे पाकिस्तानचे नेहमीचेच आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रकारातील गैरजबाबदारपणाचा योग्य अर्थ लावावा. असे वक्तव्य पाकिस्तानमधील अण्वस्त्र नियंत्रण आणि आदेश प्रणालीच्या विश्वसनीयतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात, विशेषतः जेथे लष्कर दहशतवादी गटांशी संबंधित आहे.”