नवी दिल्ली : जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे अधिकृत @Reuters x हँडल (अकाउंट) भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.यावर केंद्र सरकारने कोणताही नवीन कायदेशीर आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सरकारने एक्सकडे तातडीने स्पष्टीकरण मागवले असून, रॉयटर्सने अकाउंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. रविवारी(दि.६) सकाळी रॉयटर्सचे एक्स अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्सना एक संदेश दिसत होता- “Account withheld. @Reuters has been withheld in IN in response to a legal demand.” म्हणजेच, एका कायदेशीर मागणीच्या प्रतिसादात भारतात हे अकाउंट ब्लॉक करण्यात आल्याचे एक्स संकेतस्थळावर दर्शवले गेले.
यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, “रॉयटर्सचा अकाउंट ब्लॉक करण्याचा सरकारचा कुठलाही आदेश नाही. आम्ही एक्स सोबत संपर्कात असून, ही अडचण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.” मीडिया रिपोर्टनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ७ मे रोजी एक आदेश निघाला होता, परंतु तो कधीही लागू करण्यात आला नव्हता.सध्या एक्सने बहुधा त्याच जुन्या आदेशाची अंमलबजावणी चुकून केली असावी, असे सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.त्यामुळे सरकारने एक्सकडे तातडीने स्पष्टीकरण मागवले असून, रॉयटर्सचा अकाउंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सरकारने म्हटले असले तरी, जागतिक पत्रकार संस्थेचा अकाउंट भारतात रोखला जाणे ही गंभीर बाब आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील पत्रकार स्वातंत्र्य आणि सोशल मीडिया नियमांविषयी चर्चा होऊ शकते.जुना आदेश लागू करणे आणि तोही चुकीच्या वेळी – यामुळे एक्सची कार्यपद्धती आणि विश्वासार्हता यावरही प्रश्न उपस्थित होतो. सरकारने वेळीच स्पष्टता दिल्याने तणाव टळू शकतो, परंतु जर हा प्रकार पुन्हा झाला, तर सरकारवरच टीका होऊ शकते.
एक्सनुसार, एखादा अकाउंट “withheld” केला जातो जेव्हा सरकारकडून स्थानिक कायद्यानुसार किंवा कोर्टाच्या आदेशामुळे, एक्सकडे त्या देशात काही पोस्ट किंवा संपूर्ण अकाउंट ब्लॉक करण्याची कायदेशीर मागणी केली जाते. एक्स हे आदेश पाळण्यास बांधील असते, परंतु त्यामध्ये अचूकता आणि वेळेचे पालन आवश्यक असते.एक्सच्या हेल्प सेंटरवर स्पष्ट केले आहे की- “Country withheld content” हा संदेश देशाच्या स्थानिक कायद्यांनुसार किंवा कोर्टाच्या आदेशानुसार कोणताही पोस्ट किंवा अकाउंट तात्पुरता रोखण्यात आला असल्याचे दर्शवतो.