वॉशिंगटन : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता संपल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधीसाठी एकमत झाले आहे.पुढील १२ तासांत १२ दिवसांचे युद्ध संपले असे अधिकृत समजले जाईल.१२ दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावर युद्धविरामाबाबत माहिती देताना लिहिले की, “सर्वांचे अभिनंदन! पुढील १२ तासांत संपूर्ण युद्ध थांबवले जाईल, या मुद्द्यावर इराण आणि इस्रायलचे एकमत झाले आहे. (आतापासून जवळपास ६ तासांनंतर जेव्हा इस्रायल आणि इराण आपापली उद्दिष्टे पूर्ण करतील.) त्यानंतर युद्ध संपले आहे असे मानले जाईल”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “अधिकृतपणे इराण युद्धविरामाची सुरूवात करेल, तर १२ तासांनंतर इस्रायल. आणि २४ तासांनी १२ दिवसांचे युद्ध संपल्याबद्दल जगाकडून सलाम केला जाईल.
या शस्त्रसंधीदरम्यान, दुसरा देश शांतता आणि सन्मान राखेल. या आधारावर की सर्व काही तसेच होईल, जसे व्हायला हवे. मी दोन्ही देशांना, इस्रायल आणि इराणचे अभिनंदन करतो की, त्यांच्याकडे १२ दिवसांचे युद्ध संपवण्यासाठी सहनशक्ती, धाडस आणि बुद्धिमत्ता आहे”, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. “हे एक असे युद्ध आहे, जे अनेक वर्षे चालले असते आणि पूर्ण मध्य पूर्व आशियाला नष्ट करू शकले असते. पण, असे झाले नाही आणि तसे कधीही होणार नाही. ईश्वराची कृपा इस्रायलवर राहो, ईश्वराची कृपा इराणवरही राहो. मध्य पूर्वला ईश्वराचा आशीर्वाद मिळो. ईश्वर अमेरिकेला आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देवो”, असे म्हणत ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, इस्रायलने पहिल्यांदा इराणवर हल्ला केला होता. इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रे आणि लष्करी तळावर हवाई हल्ले केले. त्यामुळे खवळलेल्या इराणने इस्रायलवर पलटवार केला. दोन्ही देशांतील संघर्ष विकोपाला गेला. त्यात अमेरिकेनेही इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ले केले. त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचा दावा केला आहे.