इराणची धमकी, ट्रम्प यांचा थेट आणि कठोर इशारा

0

वॉशिंगटन : इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेचा सहभाग नसतानाही, इराणकडून दिल्या गेलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आणि कठोर इशारा दिला आहे.”जर आमच्यावर कोणत्याही स्वरूपात हल्ला झाला, तर अमेरिकन सैन्य अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, जे इतिहासात कधीच पाहिले गेले नाही.”असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.

ट्रम्प यांनी शनिवारी ( दि.१४) रात्री त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वरून ही प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी म्हटले की, इस्रायलच्या हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही थेट सहभाग नव्हता. त्यामुळे जर इराणने अमेरिकेला लक्ष्य केले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.तसेच ट्रम्प यांनी इराण व इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी शांततेच्या कराराचा पर्याय सुचवला आणि लिहिले की, “आपण सहजपणे एक करार करू शकतो आणि या रक्तपाताला पूर्णविराम देऊ शकतो.” मात्र त्यांनी एकाच वेळी हा इशाराही दिला की, इराणने अमेरिकेच्या संयमाची चूक केली, तर त्याला जबर किंमत मोजावी लागेल.

दरम्यान, इराणने अमेरिकेसह ब्रिटन व फ्रान्सला स्पष्ट इशारा दिला आहे. जर त्यांनी इस्रायलच्या बाजूने उभं राहत इराणी हल्ल्यांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे लष्करी तळ आणि नौदल जहाजे थेट लक्ष्य केली जातील, असा खळबळजनक इशारा दिला गेला आहे. इराणच्या अणु कार्यक्रमावरून सुरू असलेला संघर्ष आता अधिक भयानक वळण घेण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते, हे युद्ध फक्त इराण व इस्रायलपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते पश्चिम आशियात आण्विक तणावाची ठिणगी उडवू शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सडेतोड इशारा ही अमेरिकेच्या भविष्यातील धोरणाची झलक मानली जात आहे. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सहभागी नसतानाही, इराणने अमेरिकेवर हल्ला केल्यास त्याचा स्फोटक आणि विनाशकारी परिणाम होईल, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. हे वक्तव्य केवळ इराणसाठीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशियासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे – शांततेचा मार्ग स्वीकारा, अन्यथा युद्धाचा परिणाम कोणालाही परवडणारा ठरणार नाही.

डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्याच्या काही तास आधीच, शनिवारी (दि.१४) रात्री इस्रायलने इराणवर मोठा हवाई हल्ला केला. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत सलग तिसऱ्या दिवशी हा कारभार सुरू राहिला. या कारवाईत इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय, अणुस्थळे आणि वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. तेहरानमधील अणुशक्ती कार्यक्रमाशी संबंधित तळांवर हल्ला केल्याची कबुली इस्रायली संरक्षण दलाने दिली आहे. यामुळे जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले, आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech