यूकेने व्हिसा नियम बदलले ; भारत आणि चीनसह इतर देशांवर होणार परिणाम

0

लंडन : ब्रिटनने आपल्या इमिग्रेशन नियमांमध्ये मोठे बदल केले असून हे नवीन नियम २२ जुलै २०२५ पासून लागू झाले आहेत. ज्याचा परिणाम आता भारत, चीन आणि इतर अनेक देशांतील लोकांवर होणार आहे. हे बदल ब्रिटीश लेबर पक्षाच्या सरकारच्या त्या धोरणाचा भाग आहेत, ज्याचा उद्देश देशात येणाऱ्यांचा आणि देश सोडणाऱ्यांचा फरक कमी करणे, स्थानिक नागरिकांना अधिक रोजगार उपलब्ध करून देणे आणि इमिग्रेशन प्रणालीवर अधिक कठोर नियंत्रण ठेवणे हा आहे. या नव्या नियमांमुळे भारत, चीन यांसारख्या देशांतील विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आव्हाने वाढणार आहेत.

नव्या नियमांनुसार, स्किल्ड वर्कर व्हिसासाठी आता ग्रॅज्युएट लेव्हलची नोकरी अनिवार्य असणार आहे. याचा अर्थ असा की आता केवळ डिग्री-स्तराच्या नोकऱ्यांसाठीच व्हिसा मिळू शकेल.ब्रिटनने नर्सिंग असिस्टंटसारख्या केअर वर्कर पदांवर परदेशातून भरती करण्यावर पूर्ण बंदी घातली आहे.तथापि, जे लोक आधीच या व्हिसावर काम करत आहेत, त्यांच्यासाठी २०२८ पर्यंत ट्रान्झिशन कालावधी असेल, म्हणजेच ते आपला व्हिसा नूतनीकरण करू शकतील. पण नव्याने कोणीही या क्षेत्रात व्हिसा मिळवू शकणार नाही.

आता सर्व व्हिसा श्रेणींसाठी इंग्रजी भाषेतील प्रावीण्य आवश्यक आहे. मुख्य अर्जदाराला आधीच इंग्रजी बोलता व समजता यायला हवी. याआधी ब्रिटनमध्ये ५ वर्षे राहिल्यानंतर लोक इंडेफिनिट लीव्ह टू रिमेन म्हणजेच स्थायी निवासासाठी अर्ज करू शकत होते. आता हा कालावधी वाढवून १० वर्षे करण्यात आला आहे.तथापि, डॉक्टर, नर्स, इंजिनिअर किंवा एआय तज्ज्ञ यांसारख्या व्यक्तींना, ज्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर अधिक परिणाम आहे, त्यांना लवकर सेटलमेंट मिळू शकते. कोणाला ही सवलत मिळेल, हे सरकार नंतर ठरवेल.

विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएट व्हिसा, जो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काम करण्याची परवानगी देतो, त्याची मुदत २ वर्षांवरून १८ महिने करण्यात आली आहे.नियोक्त्यांना आता प्रत्येक परदेशी कामगारासाठी अधिक इमिग्रेशन स्किल्स चार्ज भरावा लागेल. हा शुल्क ३२% नी वाढला आहे. दरम्यान, या नवीन नियमांमुळे ब्रिटनमध्ये शिक्षण, नोकरी किंवा स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या भारतीयांसाठी ब्रिटनमध्ये जाणे आता कठीण होणार आहे.याशिवाय चीन, पाकिस्तान, नायजेरिया आणि श्रीलंका यांसारख्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवरही या नियमांचा गंभीर परिणाम होणार आहे. विशेषतः केअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या नायजेरियन आणि पाकिस्तानी कामगारांसाठी ब्रिटनमध्ये जाणे आता जवळपास अशक्य झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech