मोजतबा खामेनेई अजूनही जिवंत -मार्को रुबियो

0

वॉशिंग्टन : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणची सूत्रे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या हाती आहेत. मात्र, हल्ल्यानंतर आजपर्यंत मोजतबा खामेनेई सार्वजनिकरीत्या कुठेही दिसलेले नाहीत. त्यामुळे ते जिवंत आहेत की नाहीत, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीमार्को रुबिओ यांचे मत आहे की मोजतबा खामेनेई हे इराणमधील निर्णयप्रक्रियेत सक्रियपणे सहभागी असल्याचे संकेत मिळत आहेत.

मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे की, मोजतबा खामेनेई जिवंत असल्याचा त्यांना विश्वास आहे आणि पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांमध्ये त्यांची भूमिका सातत्याने वाढत आहे. अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीसमोर बोलताना रुबिओ म्हणाले, “मोजतबा खामेनेई हे नेतृत्वाशी संबंधित बाबींमध्ये एका ना एका स्तरावर अधिक सक्रिय भूमिका बजावत असल्याचे संकेत मिळत आहेत.”

अलीकडच्या काही महिन्यांत मोजतबा खामेनेई यांच्या स्थितीबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात होते. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचे वडील आणि माजी सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोजतबा खामेनेई सार्वजनिकरीत्या दिसले नसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत आणि नेतृत्वातील भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाले होते.मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालांनुसार, मोजतबा खामेनेई अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत युद्धनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

गेल्या महिन्यात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनीही स्पष्ट केले होते की, सर्वोच्च नेत्यांच्या परवानगीशिवाय इराणमध्ये कोणताही मोठा निर्णय घेतला जात नाही. त्यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांदरम्यानही सर्व महत्त्वाची धोरणे आणि निर्णय सर्वोच्च नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच घेतले जात आहेत. इराणी प्रसारण महामंडळाच्या भेटीदरम्यान पेजेशकियन म्हणाले होते की, त्यांनी नेहमीच कोणतेही विधान किंवा धोरण सर्वोच्च नेत्यांच्या विचारांच्या विरोधात जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच शासन व्यवस्थेतील विविध घटकांमध्ये असा कोणताही मतभेद निर्माण होऊ नये, ज्याचा फायदा विरोधी शक्तींना घेता येईल, यासाठीही प्रयत्न केले आहेत.

मार्को रुबिओ यांनी इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, शांतता चर्चेचा भाग म्हणून अणु विषयांवरील चर्चा अत्यंत तांत्रिक आणि गुंतागुंतीची असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. त्यांच्या मते, चर्चेच्या पुढील टप्प्यात इराणला काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. यामध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीला ठरावीक अटींवर पुन्हा खुली करणे आणि समृद्ध (एनरिच्ड) युरेनियमच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका घेणे यांचा समावेश आहे.

रुबिओ म्हणाले की, इराणला युरेनियम संवर्धन (एनरिचमेंट) कार्यक्रमावर दीर्घकालीन आणि कठोर निर्बंध स्वीकारण्याबाबत किंवा तो पूर्णपणे बंद करण्याबाबतही चर्चेसाठी तयार राहावे लागेल. ते म्हणाले, “हे अत्यंत तांत्रिक स्वरूपाचे विषय आहेत. ते पाच दिवसांत सोडवता येणार नाहीत. यासाठी तज्ज्ञांच्या पथकांना ३०, ६० किंवा ९० दिवस बसून सविस्तर चर्चा करावी लागेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा चर्चांसाठी इराणने आपली स्पष्ट संमती आणि बांधिलकी दाखवणे आवश्यक आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech