मुंबई : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ ठाकरे बंधूंनी केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २६ जुलै रोजी मुंबईत तिरंगा मार्च आयोजित करण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावली असून, या बैठकीला शहराध्यक्ष, विभागप्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मोर्चापूर्वी राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर सविस्तर संदेश प्रसिद्ध करत महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की हा तिरंगा मार्च पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी असून तो कोणत्याही राजकीय पक्षाचा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम नाही. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार असून पक्षनेत्यांच्या समर्थनाच्या घोषणाही दिल्या जाणार नाहीत. सरकारच्या भूमिकेचा निषेध आणि देशभरातील विद्यार्थ्यांना पाठिंबा व्यक्त करणाऱ्या घोषणाच दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात सांगितले की, या मोर्चाचे निमंत्रक ते आणि उद्धव ठाकरे असले तरी त्यांच्या नावानेही घोषणा देऊ नयेत. हा विद्यार्थ्यांचा लढा असल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मोर्चाला गालबोट लावण्याचा किंवा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. काही व्यक्तींनी चुकीच्या घोषणा देण्याचा, गोंधळ घालण्याचा किंवा विशेषतः महिला, मुली आणि पालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तातडीने पोलिसांच्या ताब्यात ‘समारंभपूर्वक’ द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण पोलीस जिथे नसतील, तिथे अशांचा ‘पाहुणचार’ कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातील शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
बाकी महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या हे सांगायची गरजच नाही. ते तुम्ही येणारच. पण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पण घेऊन या, त्यांची मोर्च्यात काळजी घ्या आणि ते पुन्हा सुखरूप घरी जातील हे पहा. बाकी सरकारचं माहित नाही पण महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत कारण त्यांच्यासमोर पण मुलाबाळांच्या आयुष्याचा पण प्रश्न आ वासून उभा आहे.
बाकी कुठे भेटायचं किती वाजता भेटायचं याचा तपशील तुमच्याकडे आहेच. तेंव्हा २६ जुलैला ‘तिरंगा मार्च’ ला भेटूया. सर्वांनी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्या जवळ जमायचं आहे ! आम्ही आपली , विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची वाट बघतोय ! जनतेच्या मनातील संताप काय आहे हे या शांततापूर्ण मोर्चाने दिल्लीश्वरांना दाखवून देऊया असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या संदेशाच्या शेवटी म्हटले आहे.