मुंबई : राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळी कोणालाही जाण्यापासून रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या असून फॉरेन्सिक पथकाने आधीच घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी नमुने गोळा केले आहेत. बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या आधारे पुढील तपास करण्यात येणार आहे.
बुधवारी (दि. २८) सकाळी अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले. त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. या घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, संबंधित विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८.१८ वाजता प्रथमच बारामती एटीसीच्या संपर्कात आले. त्या वेळी वारा कमी असून दृश्यमानता सुमारे ३००० मीटर असल्याची माहिती देण्यात आली होती. पायलटने रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे सांगितले, मात्र रनवे दिसत नसल्याचेही कळवले. रनवे दिसू लागल्यावर कळवतो, असे सांगूनही नंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी ८.४३ वाजता रनवे लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला होता. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत अधिकाऱ्यांनी दिली.
अपघाताच्या सविस्तर घटनाक्रमात असे नमूद करण्यात आले आहे की पुणे-बारामती परिसरात दाट धुके होते आणि दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामती विमानतळ लहान असून येथे ILS सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली. विमानाने थेट रनवेवर प्रवेश न करता मोठा वळसा घेतल्याने पहिला लँडिंग प्रयत्न रद्द करण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले. सुमारे १०० फूट उंचीवरच विमानाचा तोल गेला आणि रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच ते जमिनीवर आदळले. आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले. भीषण आगीमुळे तत्काळ बचावकार्य करणे अशक्य झाले.
VSR वेंचर्स लिमिटेडच्या लियर जेट ४५ या विमानाचे नियंत्रण लँडिंगच्या काही क्षण आधी बिघडल्याचे समोर आले असून विमान तीन तुकड्यांत तुटले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे घटनास्थळी काहीही करणे शक्य नव्हते आणि काही मिनिटांतच संपूर्ण विमान राख झाले. अपघाताचा तपास सुरू असून DGCA च्या अंतिम अहवालानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.