डिझेलच्या तुलनेत होणार खर्चात तीनपट बचत, पर्यावरणपूरक रेल्वेच्या दिशेने मोठे पाऊल
अहमदाबाद : भारतीय रेल्वेने पर्यावरण संरक्षण आणि खर्च बचतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाने देशातील पहिल्या द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) आणि डिझेलवर चालणाऱ्या दुहेरी इंधन प्रणालीच्या डिझेल मल्टीपल युनिट (डीएमयू) रेल्वेगाडीचे यशस्वी परीक्षण पूर्ण केले आहे.या अभिनव उपक्रमामुळे रेल्वे संचालनात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढणार असून, वायू प्रदूषणात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद विभागाचे मंडल रेल्वे व्यवस्थापक वेद प्रकाश यांनी साबरमती येथील एकात्मिक कोचिंग डेपोमध्ये ३० जानेवारी २०२६ रोजी या रेल्वेगाडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक वैशिष्ट्ये सविस्तरपणे स्पष्ट केली.
या प्रकल्पांतर्गत १४०० हॉर्सपॉवर क्षमतेच्या दोन डीएमयू गाड्यांचे डिझेल–एलएलजी दुहेरी इंधन प्रणालीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे डिझेलऐवजी सुमारे ४० टक्के एलएनजीचा वापर शक्य झाला आहे. वेद प्रकाश यांनी सांगितले की, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर रेल्वे संचालनाच्या दिशेने भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत असून, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाने प्रथमच DEMU च्या ड्रायव्हिंग पॉवर कारमध्ये एलएनजी आधारित दुहेरी इंधन प्रणाली यशस्वीरीत्या वापरात आणली आहे. या सुधारित रेल्वेगाड्यांनी २ हजार किलोमीटरहून अधिक अंतराचे फील्ड ट्रायल पूर्ण केले असून, सध्या त्या कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय नियमित प्रवासी सेवेत कार्यरत आहेत.
एलएनजी-डिझेल दुहेरी इंधन प्रणालीमुळे कार्बन डायऑक्साइड (CO₂), नायट्रोजन ऑक्साइड (NOx) आणि पार्टिक्युलेट मॅटर (PM) यांसारख्या घातक उत्सर्जनात मोठी घट होते. परिणामी, रेल्वे मार्गालगतच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.आर्थिकदृष्ट्या एलएनजी हे डिझेलपेक्षा तुलनेने स्वस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर खर्च बचत साधता येणार आहे. चाचणीतील आकडेवारीनुसार, एका ड्रायव्हिंग पॉवर कारमधून वार्षिक सुमारे ११.९ लाख रुपयांची, तर ८ डब्यांच्या DMU रेकमधून सुमारे २३.९६ लाख रुपयांची बचत होऊ शकते.
ही दुहेरी इंधन प्रणाली इंधनाच्या उपलब्धतेनुसार सहजपणे डिझेल आणि एलएनजीमध्ये स्विच करण्याची सुविधा देते. इंजिनची कार्यक्षमता व विश्वासार्हता पारंपरिक डिझेल इंजिनइतकीच असून, कोणतीही कार्यक्षमतेतील तडजोड न करता प्रदूषणात घट साधली जाते. या रेल्वेगाडीत २२०० लिटर क्षमतेची एलएनजी टाकी बसवण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे ९५० ते १००० किलो एलएनजी साठवता येतो. पूर्ण क्षमतेने इंधन भरल्यास ही गाडी सुमारे २२०० किलोमीटरचे संचालन करू शकते, त्यामुळे वारंवार इंधन भरण्याची गरज कमी होते. आरडीएसओकडून अंतिम मान्यता आणि उत्सर्जन चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली देशभरातील रेल्वे सेवांमध्ये विस्तारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.