एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

0

राज्याच्या १२ जिल्ह्यांत मतदान शांततेत पार; सोमवारी मतमोजणी
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ७३१ जिल्हा परिषद गट आणि १,४६२ पंचायत समिती गण यांच्यासाठी एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदानानंतर सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केले जातील. निकाल जाहीर होताच संबंधित क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५२.०२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये रायगड ५७.७७ टक्के, रत्नागिरी ४७.३८ टक्के, सिंधुदुर्ग ५०.१० टक्के, पुणे ५१ टक्के, सातारा, ५१.०१ टक्के, सांगली ५१.४७ टक्के, सोलापूर ४७.६६ टक्के, कोल्हापूर ५८.८१ टक्के, छत्रपती संभाजीनगर ५१.५२ टक्के, परभणी ५५.७१ टक्के, धाराशिव ५०.०७ टक्के, लातूर ५०.०५ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

दिवसभरातकाहीठिकाणी मतदान यंत्र बंद पडणे, वादावादीच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता शांततेत ७० ते ७५ टक्के इतके भरघोस मतदान झाले. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांना मतदान यंत्रापर्यंत जाऊ देण्यात आल्याच्या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांमध्ये मतदान पार पडले. महापालिकांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी मतदान यंत्र(ईव्हीएम) बंद पडण्याच्या घटना घडल्या. आणखी काही जिल्ह्यांत मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मात्र मतदान यंत्र दुरुस्त करून लगेच मतदान सुरु करण्यात आले.

सोलापूर जिल्हयात अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी मतदान करताना आपल्यासोबत आणलेल्या लहान मुलाला मतदान यंत्राचे बटण दाबण्यास सांगितल्याची घटना घडली. तर छत्रपती संभाजीनगरात शिवसेना(शिंदे) आमदार विलास भुमरे यांनीही लहान मुलाला मतदान केंद्रात घेऊन जात त्याच्या बोटावर शाई लावण्यास निवडणूक कर्मचाऱ्यांना सांगितले. या दोन्ही घटनांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून मतदान यंत्रापर्यंत केवळ मतदाराला जाण्याची परवानगी असताना लहान मुलांना कसे जाऊ दिले अशी विचारणा करीत सबंधित मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला असून त्यात दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत १२ जिह्यात सुमारे ७० ते ७५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८० टक्केच्या पुढे मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपली असली तरी त्यावेळीही काही मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech