नागपूर : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे (२०२६-२७ ) नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. पायाभूत सुविधा, उद्योगविकास आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित हा अर्थसंकल्प नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणुकीवर (कॅपिटल इन्व्हेस्टमेंट) देण्यात आलेला भर नागपूरसाठी विशेष महत्त्वाचा आहे. रस्ते, महामार्ग, लॉजिस्टिक हब, मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट व्यवस्था तसेच विविध औद्योगिक प्रकल्पांमुळे हजारो तरुणांना थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.या गुंतवणुकीचा थेट लाभ स्टील, सिमेंट, कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्राला होणार असून, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल, असे गडकरी यांनी नमूद केले. नागपूर–मुंबई समृद्धी महामार्ग, मिहान प्रकल्प, ड्राय पोर्ट आणि औद्योगिक कॉरिडॉर यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे नागपूर हे रोजगार व उद्योगांचे केंद्र म्हणून वेगाने पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राचा टियर-२ शहरांवर विशेष भर
केंद्र सरकारने टियर-२ शहरांवर दिलेला विशेष भर नागपूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विस्तारासाठी निर्णायक ठरणार असल्याचे गडकरी म्हणाले. एमएसएमई क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या तरतुदींमुळे लघुउद्योगांना बळ मिळेल आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि नव्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा थेट लाभ नागपूर व विदर्भातील तरुणांना होणार असून, त्यामुळे आत्मनिर्भर भारतच्या दिशेने भक्कम पावले टाकली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राला अर्थसंकल्पात मोठा वाटा
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आल्याने राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महाराष्ट्राला ८९.८५५.८० कोटी रुपयांचा कर वाटप निधी मंजूर करण्यात आला आहे. तर २०२५-२६ मध्ये राज्यासाठी ५०, ५११ कोटी रुपयांचे सहायक अनुदान मंजूर करण्यात आले होते. महाराष्ट्राला २०१४ ते २०२६ या कालावधीत कर हस्तांतरणापोटी ५.८३ लाख कोटी रुपये आणि विविध अनुदानांच्या माध्यमातून ३.६६ लाख कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकारच्या योजनांचा व्यापक लाभ
जानेवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत ३.७४ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत १.९३ कोटी आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत ४.२२ कोटी नोंदणी झाली आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत ३.२० लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून, अटल पेन्शन योजनेचे ८३.२ लाख सदस्य आहेत. पंतप्रधान स्वनिधी योजनेत १२.२ लाख लाभार्थ्यांना निधी देण्यात आला आहे.
मेट्रो, रेल्वे आणि विमानतळ विकासाला गती
नागपूर मेट्रो फेज-२ चे काम अंतिम टप्प्यात असून, फेज-३ अंतर्गत सिताबर्डी–कोराडी, बुटीबोरी एमआयडीसी–सिएट लिमिटेड आणि खापरी–न्यू नागपूर या मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. इनर रिंग रोड प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रेल्वे पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्रात १,७०, ०५८ कोटी रुपये किमतीची कामे सुरू असून ५,८७७ किमी लांबीचे ४१ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. तसेच मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे.हवाई वाहतुकीसाठी नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी ७ हजार कोटी रुपये, तर शिर्डी विमानतळ टर्मिनलसाठी ६४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्णायक अर्थसंकल्प
एकूणच पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख धोरणे आणि रोजगारनिर्मितीवर दिलेल्या भरामुळे नागपूर व संपूर्ण विदर्भात नव्या संधी निर्माण होणार असून, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.