जिप निवडणुकीत काँग्रेस आणि उबाठाला भोपळा- भाजप ७, शिंदेसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २, शरद पवार गटाला एक
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महायुतीला मोठा यश मिळाले आहे. एकूण १२ जिल्हा परिषदांपैकी ७ ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एका ठिकाणी विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला असून, सर्वत्र महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला आहे.
पंचायत समित्यांमध्ये ५० भाजप, २६ शिवसेने आणि २३ राष्ट्रवादी
फडणवीस म्हणाले की, भाजपने या निवडणुकीत २०१७ च्या विक्रमाला मागे टाकले आहे. जिल्हा परिषदांच्या घोषित जागांमध्ये भाजपला २३६ जागा मिळाल्या आहेत, ज्या गेल्या वेळच्या तुलनेत जास्त आहेत. पक्षाने ग्रामीण भागात मजबूत पकड निर्माण केली असून, जनतेने त्यांच्या कामगिरीला पसंती दिली आहे. यातून हेच स्पष्ट होते की, भाजप आता ग्रामीण भागातही रुजत चालला आहे आणि सर्व स्तरांवर पक्षाला समर्थन मिळत आहे. हे यश पक्षाच्या नेत्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पंचायत समितीच्या निकालातही भाजपने मोठी उडी मारली आहे.
२०१७ मध्ये २८४ जागा मिळाल्या होत्या, तर आता घोषित जागांमध्ये ४१० जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत. एकूण १२५ पंचायत समितींपैकी ५० भाजपकडे, २६ शिवसेनेकडे आणि २३ राष्ट्रवादीकडे असणार आहेत. यामुळे महायुतीला १०० हून अधिक पंचायत समित्या जिंकण्यात यश आले आहे, जे एक मोठे यश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महायुतीच्या मित्रपक्षांनाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. पुण्यात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर आहे, तर कोल्हापूर आणि लातूरमध्ये महायुती एकत्रितपणे आघाडीवर आहे. फडणवीस म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्र लढले आणि जनतेने त्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला. राज्यातील ग्रामीण मानसिकता समोर आली असून, महायुतीच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब झाल्याचे फडणवीस म्हणाले.
निवडणुकीदरम्यान अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःख झाले आहे. त्यामुळे मी प्रचारात भाग घेतला नाही. तरीही जनतेने महायुतीच्या कामाला विजयी केल्याचे ते म्हणाले. अजित पवारांच्या निधनानंतर मी प्रचार करणार नाही हा विचारपूर्वक निर्णय मी घेतला होता. एकदा निर्णय घेतल्यानंतर चांगल, वाईट असा विचार करायचा नसतो. पण जो निकाल आलाय, त्याबद्दल मी समाधानी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. २०१७ पेक्षा यावेळी जास्त चांगली कामगिरी झाली आहे. मी एक आवाहनाचा व्हिडिओ केला होता, ज्याचा परिणाम दिसतो आहे. आता जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करू. महायुती सरकार जनतेच्या हितासाठी काम करेल आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देईल, असेही ते पुढे म्हणाले.
विरोधक हरण्यामागची कारणे सांगताना फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाकडे इच्छा शक्ती नाही, विरोधी पक्ष फक्त माध्यमांमध्ये दिसतो जनतेत दिसत नाहीत. आम्ही ग्रामीण भागाचा विकास केला अनेक योजना आणल्या. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण केलाय. विरोधकांना याचे चिंतन करावे लागेल. जे लोक दुसऱ्यांवर खापर फोडतात ते चुकीचे आहे. महाविकास आघाडी कुठे दिसत नाहीत. रोज सकाळी ९ वाजता जे घडतेय त्याचाच दुष्परिणाम मतांवर होतोय. विरोधकांनी जनतेची नस ओळखण सोडलंय.