संयुक्त राष्ट्राच्या अहवालात पाकिस्तानचा पुन्हा भंडाफोड
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी निरीक्षण पथकाने लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. यूएनच्या अहवालानुसार, एका सदस्य राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद केल्यानुसार दिल्लीतील लाल किल्ला परिसरात ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेशी जैश-ए-मोहम्मदचा संबंध असल्याची माहिती संबंधित सदस्य देशाने यूएनला दिली आहे.
याशिवाय, संघटनेच्या बदलत्या रणनीतीबाबतही संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. रोजी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने ८ ऑक्टोबर २०२५ ‘जमात-उल-मुमिनात’ नावाच्या विशेष महिला शाखेच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केल्याचे अहवालात म्हटले आहे. या नव्या शाखेचा उद्देश दहशतवादी कारवायांना पाठबळ देणे हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून संघटना भरती आणि सहाय्याच्या पद्धतींमध्ये बदल करत असल्याचे संकेत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षण पथकाने इशारा दिला आहे की, सातत्याने होत असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईनंतरही जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटना नव्या भरती पद्धती अवलंबून किंवा प्रतीकात्मक व उच्च-प्रभावी हल्ल्यांच्या माध्यमातून स्वतःला जुळवून घेत आहेत.
अहवालानुसार, काही दहशतवादी संघटना कमकुवत किंवा विखुरलेल्या अवस्थेत असल्या तरी स्वतःचे पुनर्गठन करून उच्चस्तरीय लक्ष्यांवर हल्ले करण्याची त्यांची क्षमता अद्याप कायम आहे, जी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे. दरम्यान, काही देशांच्या मते जैश-ए-मोहम्मद ही संघटना अजूनही सक्रिय आणि कार्यक्षम आहे, तर इतर एका सदस्य देशाच्या मते ती निष्क्रिय झाली आहे. या परस्परविरोधी आकलनांमुळे गुप्तचर माहिती आणि प्रत्यक्ष कारवाईत तफावत दिसून येत असून, दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी प्रयत्न अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत.